अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने राज्यात लॉकडाऊन करण्यास विरोध केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच राष्ट्रवादीने लॉकडाऊनला असलेला विरोध दर्शविला आहे.
याआधी भाजपनेही लॉकडाऊनला विरोध दर्शवला होता.आता राष्ट्रवादीनेही विरोध दर्शववल्याने मुख्यमंत्र्यांची कोंडी झाली आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लॉकडाऊन बाबतची राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली.लॉकडाऊन हा राज्याला परवडणारा नाही.
जनतेलाही परवडणारा नाही. त्यामुळे हा पर्याय योग्य होऊ शकत नाही. त्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवायला हव्यात.
मुख्यमंत्र्यांनीही प्रशासनाला आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना केल्या आहेत. लोकांनी अजून काळजी घेतली पाहिजे.
नियम पाळल्यास कोरोना वाढणार नाही. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा प्रशासनापुढे मोठी आव्हानं उभी करत आहे.
आता कुठं अर्थचक्राला गती मिळत असतानाच कोरोना विषाणूच्या संसर्गानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आणि परिस्थिती आणखी चिघळली.
ज्यामुळं स्थानिक प्रशासनाने काही कठोर निर्बंध लागू करत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली.
काही भागांत तर कडक लॉकडाऊनचेही निर्देश देण्यात आले. पण, सर्वसामान्य जनतेत मात्र याबाबत दहशतीचं वातावरण दिसून आलं.