अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशननं दिला आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णवाढीचा दर कमी आहे.
असं असलं तरी कोरोनाचा धोका पाहता राज्यात कोरोना रोखण्यासाठीच्या नियमांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीमुळे व्यापारी आणि प्रवाशांच्या पदरी निराशा पडली आहे.
दुकाने आणि प्रवासाच्या नियमात कोणतेही बदल नसतील, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्यावर आमचा भर असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.
उर्वरित २६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि नगरमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे.
केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त लसी या केंद्र सरकारकडून मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील असल्याचं राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
ऑगस्ट महिन्यात ४ कोटी लसी उपलब्ध होतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. सध्या राज्यात होणारा लसींचा पुरवठा हा कमी असल्याचं त्यांनी सांगितलं. दुसरीकडे लसीचे दोन डोस घेतलेल्यांना आरटीपीसीआर विना राज्यात प्रवेश देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.