अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- पाथर्डी तालुक्यात शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास जोरदार वादळ व गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
शहराजवळील अमरधामसमोर राष्ट्रीय महामार्गावर मोठे झाड कोसळुन पत्र्याचे शेडचे नुकसान झाले. रस्त्याने चाललेल्या ट्रॅक्टरवर झाड पडले मात्र सुदैवाने चालक वाचला.
वीज वाहक तारा तुटुन वीजपुरवठा खंडित झाला. तालुक्यातील कासार पिंपळगाव, ढवळेवाडी, चितळी,पाडळी, हात्राळ, सैदापूर, साकेगाव, डांगेवाडी, खेर्डे,सांगवी,पागोरी पिंपळगाव,
दुलेचांदगाव,माळेगाव,अकोला, कोरडगाव या गावांमध्ये शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सध्या गहू, हरबरा, ज्वारी या पिकांची काढणी व खळे अशी कामे सुरू आहेत.
कांदा पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर झाल्याने त्याची पात गारपीटीने तुटूुन भाजीपाल्याच्या पिकांचे नुकसान झाले. फळबागा होत्याचे नव्हत्या झाल्या. मोसंबी, आंबा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले.
आंब्याचे विक्रमी पीक येणार असे वाटत असतांना शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. कोबी, फ्लावर, कोथंबीर, टोमॅटो, वांगी अशा भाज्यांचा शेतात चिखल झाला.
डांगेवाडी व परिसरातील सुमारे २५ किमी पर्यंतचा पुर्व पश्चिम डांबरी रस्ता गारपीटीने कापसासारखा दिसत होता. अशोक एकशिंगे, रघुनाथ सातपुते, अशोक सातपुते या शेतकऱ्यांसह हनुमान नगर परिसरात भुईमुग व उसाचे नुकसान झाले आहे.
नुकसानीची तीव्रता पाहता महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाला नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश आमदार मोनिका राजळे यांनी दिले आहेत.