सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्यामुळे ऊसउत्पादकांचे नुकसान !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या ऊस तोडीबाबतच्या चुकीच्या धोरणामुळे उसाची तोड वेळेत न झाल्याने ऊसउत्पादकांचे नुकसान झाले आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे यांनी केला आहे.

ऊसउत्पादकांना नुकसान भरपाई न मिळाल्यास दिनांक १९ एप्रिलपासून आपण तहसीलसमोर उपोषण करणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत शिंदे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने ऊस तोडीबाबत चुकीचे धोरण स्वीकारले आहे. कार्यक्षेत्राबाहेरून ७० टक्के ऊस आणायचा व कार्यक्षेत्रातील ९० टक्के ऊस तोडायचा, असे धोरण आखले आहे.

या धोरणामुळे कार्यक्षेत्रात ऊसतोड मजूर कमी प्रमाणात देण्यात आले. परिणामी कार्यक्षेत्रातील अवघा दोन ते अडीच हेक्­टर ऊस रोज तोडला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीला उशीर होत आहे. याचा परिणाम ऊस उत्पादकांच्या उत्पादनावर झाला आहे.

ऊस तोडणीसाठी तीन ते चार महिने उशीर झाला असून यामुळे शेतकऱ्यांचे एकरी २० ते २५ टन उत्पन्न घटले आहे.

सरासरी ३३ ते ४४ हजार रुपये नुकसान झाले आहे. या नुकसानीस कारखान्याचे संचालक मंडळ जबाबदार असल्याने कारखान्याने ऊसउत्पादकांना नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी आपण उपोषण करणार आहोत, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24