अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- राहुरीवरून नगरमध्ये आलेल्या मेंढपाळाचे साडेतीन लाख रूपये गहाळ झाल्याची घटना नुकतीच घडली होती. सदर व्यक्तीने तात्काळ चोरीला गेल्याची तक्रार कोतवाली पोलिसांकडे केली. पोलिसांनी तात्काळ नगर शहरातील ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तपास सुरू केला.
दरम्यान रक्कम असलेली पिशवी जेथे गहाळ झाली त्याच ठिकाणी ती मिळून आली. मेंढपाळला त्याची रक्कम मिळाली. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील जांभळीचे मेंढपाळ व्यवसायिक पारस सुदाम बिचकुले (वय 28) यांना चारचाकी वाहन खरेदी करायचे होते.
ते रक्कम घेऊन नगरमध्ये आले. एका चारचाकी शोरूमसमोर त्यांनी साडेतीन लाख रूपये रक्कम असलेली पिशवी ठेवली. सदरची पिशवी त्याच ठिकाणी विसरून बिचकुले कोतवाली पोलिसांच्या हद्दीत आले. रक्कम असलेली पिशवी चोरीला गेल्याचे बिचकुले यांनी कोतवाली पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी काही ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी बिचकुले यांनी शोरूमसमोरील एका चारचाकी वाहनावर रक्कम असलेली पिशवी ठेवली होती, ती पिशवी त्याच ठिकाणी आढळून आली. पोलिसांच्या तत्परतेमुळे बिचकुले यांना त्यांची रक्कम मिळाली. यामुळे कोतवाली पोलीस पथकांचे कौतूक करण्यात आले.