ताज्या बातम्या

लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात १२ हजार ४७१ पशुपालकांच्या खात्यांवर ३४ कोटी रुपये जमा राधाकृष्ण विखे पाटील

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले,अशा १२ हजार ४७१ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. ३३.८५ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले,राज्यामध्ये दि. १२ डिसेंबर २०२२ अखेर ३५ जिल्ह्यांमधील एकूण ४हजार १ संसर्गकेंद्रांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण ३लाख ७५ हजार५७६ बाधित पशुधनापैकी एकूण २लाख ९६ हजार५७४ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे.

उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण १४४.१२ लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण १३९.८९ लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे १०० % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.

रोग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी “माझा गोठा, स्वच्छ गोठा” अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्वसाधारणपणे गोधनास कळपामध्ये चरण्यासाठी पाठविणे आणि सार्वजनिक पाणवठ्यावर त्यांना पाणी पाजण्यासाठी कळपाने नेण्याच्या गावांमधील दोन्ही पद्धती देखील लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भावास कारणीभूत असल्याचे मत राज्यस्तरीय कार्यदलाने व्यक्त केले असल्यामुळे महाराष्ट्र राज्य यांनी या दोन्ही पद्धती लंपी चर्मरोग नियंत्रणात येईपर्यंत बंद ठेवण्याबाबत गोपालकांमध्ये जागृती करण्याच्या सूचना श्री विखे पाटील यांनी दिल्या.

श्री. विखे पाटील यांनी आवाहन केले आहे की, महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवण्यात याव्यात.

शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दिलेल्या सुधारीत उपचार प्रोटोकॉल प्रमाणे उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे.

शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्यामुळे सर्व पशुपालकांना विशेषरुपाने आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पशुधनावर उपचार करून घेण्यासाठी सहकार्य करावे.

क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कृती दलासमवेत झालेल्या दृकश्राव्य माध्यमाद्वारे आढावा बैठकीमध्ये लसीकरण न केलेल्या आणि लंपी चर्म रोगाने बाधीत नसलेल्या गायींच्या कुठल्याही वयाच्या वासरांना, तसेच अद्यापही लसीकरण न झालेल्या गोवंशीय पशुधनास लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले.

यानुसार, गोपालकांनी त्यांच्या वासरे व गोवंशीय पशुधनास क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गावांमध्ये अशा लसीकरणासाठी मोहीम स्वरूपात पुर्वनिर्धारीत केलेल्या दिवशी लसीकरण करून घेण्याचे आवाहन मंत्री श्री.विखे पाटील यांनी केले आहे.

Ahmednagarlive24 Office