अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मिळावा म्हणून मदत करण्यासाठी पाच लाखांची मागणी करीत त्यापैकी एक लाख रूपये मध्यस्थाकरवी घेताना पुण्यातील सहायक पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक राहूल पाटील असे या आधिकाऱ्याचे नाव असून पाटील याच्यासाठी लाच घेणाऱ्या संतोष भाऊराव खांदवे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील हे विमानतळ पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक या पदावर काम करीत आहेत.
याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविण्यात आली होती. तक्रारदाराच्या वडिलांविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्यात तक्रारदाराने वडिलांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. जामिनास विरोध न करणे तसेच अनुकुल अभिप्रायासाठी पाटील यांनी तक्रारदाराकडे पाच लाखांची लाच मागितली होती. तडजोडीत तक्रारदाराने तीन लाखांची लाच देण्याचे मान्य केले.
लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाखांची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून खांदवेला एक लाखांची लाच घेताना पकडले.