अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- नेवासा शहर व नेवासा बुद्रुक या गावांच्या मध्यावर असलेली प्रवरा नदी दुतर्फा भरून वाहू लागल्याने या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अनेक अनेक तरुण मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.
याचाच एक भाग म्हणून नेवासा शहरालगत आसलेला मध्यमेश्वर बंधारा सध्याच्या स्थितीला अनेकांच्या उपजिविकेचे साधन बनला आहे. करोना सारख्या महामारीत अंडी चिकन मासे या मांसाहाराला एकीकडे मागणी वाढत आहे.
त्यामुळे अनेक तरुणांना या बंधार्यामुळे मासेमारी करणं सोपं जातं व दिवसभर जाळे टाकून पकडलेल्या माश्यांना बाजारात चांगला भाव व प्रतिसाद देखील मिळत आहे. यामुळे मच्छीमारांचा आर्थिक गाली रुळावर येऊ लागली आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरण, बंधारे, ओढे-नाले भरून वाहू लागल्याने प्रवरा नदीला येणार्या पाण्याच्या प्रवाहामुळे मोठ्या प्रमाणात मासे वाहून येत आहेत.
मोठ्या आकाराचे मासे वाहून येत असल्याने गोरगरीब मच्छिमार सध्या खुश आहेत. या प्रवाहामध्ये खेकडे, चिलापी, चोपडा, वाम, रावस आदी विविध प्रकारच्या माशांच्या प्रजाती आढळून येतात.
यातील मासे, पुणे, मुंबई, कल्याण, डोबिवली, नाशिक, नगर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यात विक्रीसाठी नेले जातात. यामुळे मच्छीमार व्यावसायिकांची आर्थिक विस्कटलेली घडी आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे.