Maharashtra weather news :- अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे येत्या चोवीस तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा थंडी लांबणार आहे.
नाशिक जिल्ह्याला सप्टेंबर महिन्यात पावसाने झोडपून काढले. त्यात ऐन दिवाळीत शुक्रवार, शनिवारी देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात आज सकाळपासूनही ढगाळ वातावरण आहे.
आता दिवाळीनंतर तरी थंडी वाढेल असा अंदाज होता. मात्र, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे.
त्यात मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
या जिल्ह्यात 40 किमी प्रतितास वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, 10 नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
केरळ आणि माहेमध्ये सोमवारी, तर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात आणि यानामध्ये सोमवारी आणि मंगळवारी पाऊस हजेरी लावू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.