अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- विविध क्षेत्रात देशात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र राज्याने कोविड १९ या वैश्विक संसर्गाला धैर्याने तोंड देत या संकटकाळात आरोग्य यंत्रणा बळकट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य या संकटाचा निकराने सामना करीत आहे.
कोविड १९ विरूध्दच्या लढाईत वेळोवेळी जनतेसोबत थेट संवाद साधत मुख्यमंत्री राज्यातील जनतेच्या पालकत्वाची भूमिका वठवत असून त्यांना आधार देत आले आहेत. राज्याने आरोग्य यंत्रणा बळकट करून हा लढा अधिक भक्कम केला परिणामी रुग्ण संख्येत घट झाली व रुग्ण बरे होण्याची संख्याही वाढली आहे. लसीकरणातही राज्याने देशात आघाडी घेतली असून तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स नेमून कोरोनाची संभाव्य तिसरी लाट परतवून लावण्याची तयारी केली आहे.
राज्याने कोविड १९ च्या व्यवस्थापनासाठी केलेल्या यशस्वी कार्यवाहीवर प्रकाश टाकणारा हा लेख. गेल्यावर्षी कोरोना संसर्ग सुरु झाला तेव्हा राज्याच्या हातात योग्य ती साधने नव्हती, सोयी नव्हत्या, उपकरणे नव्हती. मात्र, सव्वावर्षांत बऱ्याच साधनसामग्रीची उपलब्धता करण्यात आली. कोविड केअर सेंटर्स, बेड्स,आयसीयू सुविधा, व्हेंटिलेटर्स, औषधी, मास्क,ऑक्सिजन उपकरणे अशा अनेक बाबी राज्याने उभारल्या.
या सुविधा वाढविताना टाळेबंदीसह काही निर्बंधही लावले, याचाच सुपरिणाम म्हणून रुग्ण संख्या आटोक्यात येवू लागली आहे. यावर्षी मार्च महिन्यात राज्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आव्हान वाढवले. विशेषत: ऑक्सिजन मिळविण्यासाठी धडपड झाली. मात्र, राज्याने तातडीने ‘मिशन ऑक्सिजन’ सुरु करून दररोज १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीसह ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचे लक्ष ठेवले.
लसीकरणामध्ये महाराष्ट्राने दोन्ही डोस देण्यात देशात पहिले तर एकूण डोस देण्यात दुसरे स्थान मिळवून ६ कोटी ४० लाख लस मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात यावर्षी कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीला दिवसाकाठी ६० हजार रुग्ण संख्या झाली.
याचा सामना करण्याकरिता उपचाराच्या सुविधा,ऑक्सिजनची उपलब्धता, संसंर्ग टाळण्यासाठी कठोर निर्बंध लावण्यात आले परिणामी जून महिन्यापासून राज्यातील कोरोनाच्या दैनंदिन रुग्ण संख्येत घट होवू लागली व आज हा आकडा ३ ते ४ हजारांच्या घरात आला आहे. राज्य शासनाने पहिली लाट थोपवताना उभारलेल्या सुविधांच्या जोडीला यावेळी उपचाराच्या नव्याने सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
राज्यात उपलब्ध सुविधांवर एक नजर
राज्यात ६०९ चाचणी प्रयोग शाळा आणि ५ हजारांहून अधिक कोविड केअर सेंटर्स आहेत. आजपर्यंत कोरोना उपचाराच्या ६ हजार ९५९ सुविधा असून यात ४ लाख ९७ हजार ९७ आयसोलेशन खाटांचा (आयसीयू खाटा वगळून) समावेश आहे. त्यामध्ये १ लाख २१ हजार ऑक्सिजन खाटा आहेत.
राज्यात ३६ हजार ७०२ आसीयू खाटा असून १४ हजार २४५ व्हेंटिलेटर्स आहेत. कोविड रुग्णांसाठी ३ लाख ५१ हजार ३३० खाटा उपलब्ध आहेत. कोविड संशयित रुग्णांसाठी १ लाख २७ हजार ७२१ आयसोलेशन खाटा, १५ लाख ८६ हजार ९६ पीपीई कीट आणि २६ लाख १८ हजार ८६० एन९५ मास्क उपलब्ध आहेत.
मिशन ऑक्सिजनची घौडदौड
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेता राज्यात ‘मिशन ऑक्सिजन’ राबविण्यात येत आहे. दररोज १३०० मेट्रीक टन ऑक्सिजन उत्पादित होत असून ही क्षमता ३ हजार मेट्रीक टन नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आवश्यक ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (पीएसए) बसवण्यात येत आहे.
जून अखेर पर्यंत सुमारे ३८ पीएसए प्लान्ट कार्यान्वित झाले असून त्याद्वारे दिवसाला सुमारे ५३ मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती झाली. राज्यातील साखर कारखाने, पेपर, पोलाद, पेट्रोलियम, फर्टिलायझर, रिफायनरी उद्योगांच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती वाढविण्यात येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची वाढती मागणी पाहता राज्याने अन्य राज्यांमधून ३५० मेट्रीक टन ऑक्सिजन घेतला.
आर्थिक पाठबळ
कोरोना संसर्गाच्या संकटांचा निकराने सामना करण्याकरिता राज्य शासनाने आर्थिक पाठबळ दिले. कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांसाठी जिल्हा नियोजन समित्यांच्या माध्यमातून ३ हजार ३०० कोटी रूपये उपलब्ध करून दिले. राज्यातील ३५० आमदारांना त्यांच्या स्थानिक विकास निधीतून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी प्रत्येक १ कोटी प्रमाणे ३५० कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली.
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी ८ हजार ९५५ कोटी २९ लाखांची तर वैद्यकीय शिक्षण विभागासाठी १ हजार ९४१ कोटी ६४ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के
सप्टेंबर महिन्यांच्या पहिल्या आठवडयापर्यंत राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०८ टक्के झाले आहे, देशाचा हा दर ९७.४८ टक्के तर जगाचा ८९.४८ टक्के आहे. राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ६० लाख ८८ हजार ११४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ६१७ नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. तुलनेने ६३ लाख ९ हजार २१ रुग्ण या आजारातून बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्यू दर २.१२ एवढा आहे व आतापर्यंत १ लाख ३७ हजार ८९७ लोकांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.
लसीकरणात अव्वल
राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला वेग आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयापर्यंत राज्यातील १ कोटी ७६ लाख ४५ हजार ८५५ नागरिकांना दोन्ही डोस देत, देशात अव्वल ठरले आहे. केंद्र शासनाकडून लसी उपलब्ध होताच एका दिवसात ११ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचा विक्रमही राज्याच्या नावावर नोंदला गेला आहे. पहिला व दुसरा डोस मिळून राज्यातील ६ कोटी ४० लाख ७८ हजार ९१९ जनतेला लस मात्रा देत महाराष्ट्र देशात दुस-या क्रमांकावर आहे.
केंद्र शासनाकडून प्राप्त लसीनुसार राज्यात दररोज सुमारे ३ ते ४ लाख नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.राज्यातील १८ पेक्षा अधिक वयाच्या लोकसंख्येपैकी ४८.६४ टक्के नागरिकांना एक डोस दिला गेला आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकसंख्येपैकी ३७.८८ टक्के नागरिकांना पहिला लसीचा डोस देण्यात आला आहे तर ४५ पेक्षा अधिक वयाच्या कमीत कमी एक डोस दिला गेलेल्या नागरिकांचे प्रमाण ५५.२४ टक्के एवढे आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, ४५ पेक्षा जास्त वयोगटातील आणि १८ ते ४४ वयोगटातील नागरिक अशा एकूण ६ कोटी ४० लाख ७८ हजार ९१९ जनतेला आतापर्यंत लस मात्रा देण्यात आल्या आहेत.
कोविड कृतीदलाची स्थापना ; ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेचे आयोजन
महाराष्ट्रात कोरोना संसंर्गाची लाट आली तसे या संकटाचा सामना करण्याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टापे यांच्यासह संबंधित विभागांनी कंबर कसून कामाला सुरुवात केली. कोरोना संसर्गाची लाट थोपवून धरण्यासाठी व परतवून लावण्याकरिता मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संकल्पनेतून तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असणाऱ्या राज्य कोविड कृतीदलाची स्थापना करण्यात आली.
या कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक असून सदस्य सर्वश्री डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई आदींचा यात समावेश आहे. कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला आहे. या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांचे कृती दल तयार केले असून या १४ सदस्यीय कृती दलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभु आहेत. मुख्यमंत्री महोदय कायम या कृतीदलांच्या संपर्कात असून त्यांनी या कृतीदलांच्यावतीने वेळोवेळी आयोजित परिषदांमध्ये सहभाग घेवून मार्गदर्शन केले आहे.
संभाव्य तिस-या लाटेची तयारी
कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने नुकतेच ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला संबोधन करताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोना संसर्गाविरूध्दच्या युध्दात डॉक्टर, नर्सेस, पोलीस, अग्निशमनदल कर्मचारी आदी कोरोना योद्धे हे शस्त्र असल्याचे सांगितले. राज्यातील रुग्णालय व्यवस्था, यंत्रसामग्री,औषध उपलब्धतेबाबतही लक्ष देण्यात येणार असल्याचे अधोरेखित केले. राज्यात दुसरी लाट कायम आहे आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा बंदोबस्त करण्यासाठी जनतेसह सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांची पालकत्वाची भूमिका
राज्यात सुरु झालेल्या कोरोना संसर्गापासूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकत्वाच्या भूमिकेतून वेळोवेळी जनतेशी संवाद साधत आहेत व त्यांना धीर देत आहेत. त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कोरोनाकाळात वेळोवेळी जनतेशी संवाद साधला. राज्यातील वृत्त वाहिन्यांद्वारेही घराघरात पोहचलेल्या या संवादातून त्यांनी राज्यशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. प्रसंगी राज्यातील जनतेने कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्यासह नियम पाळण्याविषयीही ते मार्गदर्शन करीत आहेत.
जनतेसोबतच्या संवादातच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ आणि ‘मी जबाबदार’ या महत्वाच्या घोषणा देत मुख्यमंत्र्यांनी राज्यात कोरोनाविरुध्दच्या लढाईसाठी हे दोन उपक्रम सुरु केले. कोरोनास्थितीत डळमळीत झालेली स्थिती सावरून राज्याला पुन्हा उभेकरण्यासाठी त्यांनी याच मंचावून ‘मिशन बिगिन अगेन’ आणि ‘ब्रेक दि चेन’ या कार्यक्रमांची घोषणा केली. ‘ब्रेक दि चेन’ निर्बंधकाळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ५ हजार ४७६ कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले.
राज्यात या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबाजवणी सुरु आहे. इतिहासकाळापासून विविध संकटांवर समर्थपणे मात करणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या थोर पंरपरेला साजेशे कार्य करत राज्यशासन कोरोना संसर्गाचा नेटाने मुकाबला करत या संकटावर मात करण्याच्या दिशेने समर्थपणे मार्गक्रमण करीत आहे. राज्यात मोठया प्रमाणात उभारण्यात येत असलेल्या सुविधा व गतीमान पध्दतीने सुरु असलेले लसीकरण तसेच कोरोना प्रतिबंधात्मक अन्य महत्चाच्या उपाययोजना व कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून महाराष्ट्र हे संभाव्य तिसऱ्या लाटेलाही परतवून लावण्यासाठी सज्ज होत आहे.