अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्हा सहकारी बॅकेच्या चार जागांची मतमोजणी रविवारी झाली. सर्वांचे लक्ष लागलेल्या नगर तालुका विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघ या जागेवर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले निवडून आले.
या शिवाय पारनेर व कर्जत विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून अनुक्रमे उदय शेळके, अंबादास पिसाळ निवडून आले आहेत. तर बिगरशेती संस्था मतदारसंघात प्रशांत गायकवाड विजयी झाले.
दरम्यान, बँकेच्या निवडणुकीत या अगोदर सतरा संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. बँक पुन्हा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आली आहे.
या बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला आहे. पुन्हा महाविकास आघाडीचे वर्चस्व बँकेमध्ये पाहायला मिळाले आहे. बँकेतील निवडणूक लढाई भाजप विरूद्ध महाविकास आघाडी झाली.
त्यातही विखे विरूद्ध थोरात असाच हा सामना झाला. यात विखे गटाला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. अण्णासाहेब म्हस्के व अंबादास पिसाळ हेच अवघे 2 जण विखे गटाचे बँकेत संचालक झाले आहेत.
एकंदर बँकेत महाविकास आघाडीने भाजपला चारीमुंड्या चीत केले आहे. या निवडणुकीत थेट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले होते.
विखे-कर्डीले व प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे स्वतंत्र पॅनल करण्याचे नियोजन होते. परंतु महाविकास आघाडीने त्यांची रणनीती चालू दिली नाही.
सहमती एक्स्प्रेस नीती अवलंबून भाजपचे काही उमेदवार बिनविरोध केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकेका जागेसाठी फिल्डिंग लावली होती.
त्यात ते यशस्वी झाले. बँकेच्या इतिहासात प्रथमच 17 संचालक बिनविरोध निवडून आले होते. त्यामध्ये बारा संचालक थोरात गटाचे होते. तर उर्वरित विखे गटाचे मानले जात होते.
पण प्रत्यक्षात त्यापैकी अवघा 1 संचालक त्यांचा होता व बाकी 4 जण सहमतीचे होते. या निवडणुकीमध्ये भाजपाचा दारुण पराभव झाला.
असा आहे निवडणूक निकाल :- सेवा संस्था मतदारसंघ
पारनेर – उदय शेळके (विजयी, मतदान ९९) विरूद्ध रामदास भोसले (६ मते). शेळके 93 मताधिक्याने विजयी.
नगर तालुका – माजी आमदार शिवाजीराव कर्डिले (विजयी ९४ मते) विरूद्ध सत्यभामा बेरड (महाविकास आघाडी १५). कर्डीले 79 मताधिक्याने विजयी.
कर्जत – अंबादास पिसाळ (भाजप विजयी ३७) विरूद्ध मीनाक्षी साळुंके (काँग्रेस ३६ मते). पिसाळ 1 मताने विजयी.
बिगर शेती संस्था – प्रशांत सबाजीराव गायकवाड (राष्ट्रवादी विजयी ७६३) विरूद्ध दत्ता पानसरे (५७४). गायकवाड 189 मताधिक्याने विजयी.