अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी कोविड संकटात तरी शहाणपणा शिकायला पाहिजे होता; परंतु दुर्दैवाने फक्त केंद्र सरकारला दोष देण्याचे षडयंत्र रचताना राज्य सरकार आपले दायित्व पूर्णपणे विसरले असल्याची टीका भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
राहाता येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ ते ४५ या वयोगटातील लसीकरणाचा शुभारंभ आमदार विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. केंद्रात लसीकरणासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधून येत अडचणी जाणून घेतल्या.
प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार कुंदन हिरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, वैद्यकीय अधिकारी गोविंद घोगरे, गणेश कारखान्याचे चेअरमन मुंकूदराव सदाफळ, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पिपाडा, भाजपचे उपाध्यक्ष रघूनाथ बोठे, युवा मोर्चाचे अध्यक्ष सतिष बावके आदी याप्रसंगी उपस्थित होते.
आमदार विखे पाटील म्हणाले की, लसीकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा ज्येष्ठ नागरीक आणि कोविड योद्ध्यांना प्राधान्य दिले; मात्र संकटाची भीषणता लक्षात घेऊन १८ ते ४४ वयोगटातील नागरीकांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.
लसींची उपलब्धता आणि पुरवठा यामध्ये तफावत होत असली, तरी केंद्र सरकार लस उपलब्ध करून देण्यात कमी पडत नाही. आता इतर देशांमधूनही लसीची उपलब्धता करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा सुरू झाला असल्याने लसीची मात्रा मोठ्या संख्येने उपलब्ध होईल,
असा विश्वास आ. विखे पाटील यांनी व्यक्त केला.महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचा वेळ फक्त केंद्र सरकारवर टीका करण्यात जात आहे.
राज्य सरकारने असलेल्या पायाभूत सुविधांचा उपयोग करून लसीकरण उपक्रम राबविला पाहिजे. यासाठी सरकारी यंत्रणेकडून नोंदणी आणि नागरीकांना ॲप तयार करून संदेश देण्याची व्यवस्था केली असती,
तर हा गोंधळ टाळता आला असता; परंतु आघाडी सरकार कोविडच्या संकटातही शहाणपण शिकले नसल्याची टीका करून सरकारच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना आरोग्य सुविधांसाठी वणवण करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.