अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- वीजबिल थकल्यामुळे विद्युत मंडळाने नेवासा तालुक्यातील मक्तापूर ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे पथदिवे दोन दिवसांपासून बंद असून गाव अंधारात बुडाले आहे.
दरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या दोन कूपनलिकाही बंद असल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे.
यामुळे महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. येत्या दोन दिवसांत या समस्या न सुटल्यास मक्तापूर ग्रामपंचायतीवर महिलांसमवेत हंडा मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेना शाखाप्रमुख गणेश झगरे व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, नेवासा तालुक्यातील मक्तापूर ग्रामपंचायतीचे साडेचार लाख रुपये वीज बिल थकीत आहे. २०१९ साली ग्रामपंचायतीने अल्पशी रक्कम वीज बिलापोटी भरली होती.
त्यानंतर आजतागायत वीज बिल भरणा न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढली आहे. यासंदर्भात विद्युत मंडळाने ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही ही रक्कम भरली गेली नाही. थकबाकी वाढल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
मात्र यामुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहे. या समस्या ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित दूर कराव्यात अन्यथा सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.