ताज्या बातम्या

“एवढ्या वर्षात कधी मलिकांवर आरोप झाले नाहीत, राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही”; मलिकांच्या राजीनाम्याची मागणी शरद पवारांनी धुडकावली

Published by
Renuka Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीने (ED) अटक केली आहे. नवाब मलिक यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. भाजपकडून मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी ही मागणी नाकारली आहे.

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप (BJP) चांगलीच आक्रमक झाली आहे. मुंबईत (Mumbai) भव्य मोर्चा काढणार असल्याचाही भाजपकडून इशारा देण्यात आला आहे. मात्र शरद पवार यांनी मोर्चाअगोदरच भाजपची मागणी धुडकावून लावली आहे.

शरद पवार म्हणाले, नवाब मलिकांचा कशासाठी राजीनामा घ्यायचा? जो माणूस २५-३० वर्ष विधीमंडळात आहे. या वर्षात कधी त्यांच्यावर आरोप केला नाही. आता करत आहेत.

एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला तर तो दाऊदशी संबंधित ठरवला जातो हे चुकीचं आहे. आम्ही मलिकांच्या पाठिशी आहोत असेही शरद पवार यांनी खडसावून सांगितले आहे.

दरम्यान भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत नवाब मलिक यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. सरकारने त्याबाबतची घोषणा करावी अशी मागणी केली आहे.

शरद पवार यांनी नवाब मलिक यांचे समर्थन केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नवाब मलिक यांच्या राजीनाम्याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी भाजपकडून मोर्चा काढण्यात येत आहे. आझाद मैदानावर असंख्य भाजपचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजन आदी नेते आझाद मैदानातील मोर्चात सामिल होण्यासाठी निघाले आहेत.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar