अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- निमगाव वाघा (ता. नगर) येथे आनखी एक कोरोना लसीकरण केंद्र व लसीचा कोटा वाढवून देण्याची मागणी एकता फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी व नगर तालुका आरोग्य अधिकारी यांना फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके यांनी दिले.
यावेळी उपाध्यक्ष रामदास पवार, सचिव अरुण अंधारे, रितेश डोंगरे आदी उपस्थित होते. निमगाव वाघा येथे एकच कोरोना लसीकरण सुरु आहे. आठवड्यातून एकच दिवस लसीकरण केले जात आहे. यामुळे गावात अत्यंत कमी प्रमाणात लसीकरण होत आहे.
नगर तालुक्यात कोरोनाचे प्रमाण वाढत असताना लसीकरणाची संख्या वाढवण्याची गरज आहे. आठवड्यातून एकदाच लसीकरण होऊन देखील पुरेश्या प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याने, अनेक ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांना लस न घेता घरी जावे लागत आहे. तर लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे.
अनेक ग्रामस्थ लसीकरणापासून वंचित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गावात सध्या एकच लसीकरण केंद्र असल्याने लस उपलब्ध झाल्यास केंद्रावर गर्दी होत आहे. लसीकरण केंद्रावरील गर्दीमुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
गावात आनखी एक लसीकरण केंद्र उपलब्ध झाल्यास गर्दी न होता नागरिकांची सोय होऊन नियोजनरित्या लसीकरण करता येणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या संदर्भात गांभीर्याने विचार करुन निमगाव वाघा (ता. नगर) येथे आनखी एक कोरोना लसीकरण केंद्र व लसीचा कोटा वाढवून देण्याची मागणी एकता फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.