अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- नगर तालुक्यातील एका बागायतदाराला प्रेमपाशात अडकवून नाजूक संबंधाचा व्हिडिओ काढणार्या तरूणीच्या मोहजालात अनेक जण अडकले आहेत.
मात्र तिच्या दहशतीपोटी अद्याप कोणी फिर्याद देण्यासाठी पुढे आलेले नाही. यातून बडे हनीट्रॅपचे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या तरूणीसह एजंट अमोल सुरेश मोरे याला रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता
त्यांना न्यायालयाने 20 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नगर तालुक्यातील एका बागायतदाराला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नगरमधील किराणा दुकानदार मोरे याच्या मदतीने नाजूक संबंधाचे व्हिडीओ चित्रिकरण जखणगाव येथील तरूणीने केले होते.
त्या बागायतदाराला मारहाण करत त्याच्या अंगावरील सोन्यांचे दागिने व रोकड असा साडेपाच लाखांचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतला. त्यानंतर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करून एक कोटी रुपयांची मागणी केली.
बागायतदाराने नगर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने या हनीट्रॅपचा पर्दाफाश झाला आहे. तरूणी व एजंट मोरे यांना पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर हजर केले होते. मोबाईलमध्ये चित्रिकरण केलेल्या व्हिडीओची माहिती घेणे बाकी आहे. अजून कोणाची फसवणूक केली.
तरूणीच्या भितीने लोक अजून पुढे येत नाही, आत गुन्हा दाखल झाल्याने फिर्याद देण्यासाठी लोक पुढे येण्याची शक्यता आहे. गुन्ह्यातील अजून काही मुद्देमाल जप्त करणे बाकी आहे.
आरोपीविरूद्ध अजून गुन्हे दाखल होण्याची शक्यता असून त्यांना जामीन झाल्यास ते फिर्याद देणार्यांना धमकावतील यामुळे आरोपींना पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयासमोर केली.