अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- मराठा आरक्षणासंदर्भात रणनिती ठरविण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले हे आज शनिवार दिनांक १२ रोजी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याच्या भव्य स्वागताची तयारी जिल्हात सुरु आहे.
कोपर्डीतील घटनेपासून मराठा आंदोलन सुरू झाले, मात्र तेथील निर्भयावरील अत्याचाराचा खटला उच्च न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे.
या नव्या आंदोलनात त्याचाही समावेश केला जावा, यासाठी कोपर्डीकरांनी तयारी सुरू केली आहे. मराठा समाजाला आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्या संदर्भात युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्रात आंदोलनाची हाक दिली आहे.
या संदर्भात संभाजीराजे आज नगर जिल्हयातील कोपर्डी येथे दुपारी दोन वाजता येत असून जिल्हयातील सर्व समन्वयक, मराठा संघटनाचे पदाधिकारी, कोपर्डी ग्रामस्थ, पीडितेच्या कुटुंबाशी चर्चा करणार आहेत व तेथून आंदोलनाचे रणशिंग फुकणार आहेत.
त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणाऱ्या गंगापूर तालुक्यातील काकासाहेब शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन तेथेही भेट देणार आहेत.