अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- सर्वोच्च न्यायालयाबाबत आदर असला तरी मराठा आरक्षणाबाबत लागलेला निकाल अनपेक्षित व अतिशय धक्कादायक आहे.
राज्य सरकार व अनेक समाज प्रतिनिधींनी आरक्षणाबाबत अतिशय काटेकोर व अभ्यासात्मक बाजू मांडूनही आरक्षण रद्द झाले. हे मराठा विरोधी मानसिकतेच्या राजकीय हेतूस पूरक आहे, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजीव भोर यांनी व्यक्त केली आहे.
मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने आदर्श मूक मोर्चे काढले. शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्यांकडे सर्व जगाचे लक्ष वेधून घेतले. मात्र समाजाच्या या संयमाचे फळ अनपेक्षित मिळाले आहे. देशातील काही राज्यांत नुकताच विधानसभेचा निकाल लागला.
संपूर्ण देशात हाताबाहेर गेलेली कोरोनाची परिस्थिती आहे. त्यावर ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत, त्यामुळे जनता त्रस्त आहे. न्यायालयाच्या कामकाजासाठी अशी प्रतिकूल परिस्थिती असतानाही अचानक मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणे,
हेच अनेक शंकांना वाव व संभ्रम निर्माण करणारे आहे, असेही भोर म्हणाले. राज्यातील समाजनिष्ठ, प्रामाणिक कार्यकर्ते लवकरच मराठा आरक्षण लढ्याबाबत विचार विनिमय करुन संघटितपणे पुढील दिशा ठरवतील. आरक्षणाचा संघर्ष थांबणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.