अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- अल्पवयीन मुलीचे तिच्या इच्छेविरुद्ध लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणी १५ वर्षीय मुलीच्या फिर्यादीवरून तिचे आई-वडील, सासू-सासरे, पती व नणंदेच्या विराेधात ताेफखाना पाेलिसांनी गुन्हा दाखल केला.
पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे, १५ मार्च २०२० रोजी माझ्या मामाचे लग्न होते. मी आई, वडिलांबरोबर लग्नाला गेले होते. तेथे गेल्यानंतर राहुलशी माझी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.
याबाबत माझ्या आई, वडिलांना समजले. मी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना त्यांनी माझ्या इच्छेविरूद्ध २९ जून २०२० रोजी राहुलशी माझे लग्न लावून दिले. लग्नानंतर राहुलने इच्छेविरूद्ध शरीरसंबंध ठेवले. डिसेंबरमध्ये मी गरोदर असल्याचे समजले.
मला गर्भ ठेवायचा नव्हता, परंतु पती राहुलने ठेवायला सांगितला. माझ्या पुढील शिक्षणालाही विरोध करण्यात आला. त्यानंतर मी आई, वडिलांकडे गेले असता त्यांना याबाबत सर्व सांगितले. २७ फेब्रुवारी २०२१ ला राहुल, त्याचे आई-वडील, राहुलची बहीण व दाजी माझ्या वडिलांच्या घरी आले.
राहुलच्या कुटुंबीयांनी आम्हांला गर्भ ठेवायचा असल्याचे सांगितले. त्यास माझ्या वडिलांनी नकार दिला. मुलीचे वय कमी असून पुढे शिक्षण सुरू ठेवायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचा राग आल्याने त्यांनी आई-वडिलांना व मला शिविगाळ, दमदाटी केली.
आई-वडिलांना मारहाणही केली. याबाबत वडिलांनी तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आई-वडिलांना, तसेच सासू, सासरे, नणंद व नणंदचे पती यांना मी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानादेखील माझे लग्न लावून देण्यात आले, असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.