अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-सासरच्या छळास कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत घडली आहे.
अर्चना शनेश्वर नवले (वय वर्षे २७ ) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेच्या आई रंजना अरुण पालेकर राहणार साबळेवाडी,
तालुका बारामती, जिल्हा पुणे यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
अर्चनाचे लग्न दहा वर्षांपूर्वी शनेश्वर मच्छिंद्र नवले याचे बरोबर झाले होते. लग्न झाल्यानंतर साधारण दोन वर्ष अर्चनाला चांगली वागणूक मिळाली.
मात्र, त्यानंतर तिचा पती शनेश्वर व सासू मीराबाई कामाच्या बाबतीत तक्रारी करत व मुले होत नाहीत म्हणून, तिला छळत करीत उपाशी ठेवत होते.
अर्चना माहेरी आल्यावर याबाबत सर्व सांगत होती. परंतु, आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्यामुळे आम्ही तिला समजून सांगत नांदायला पाठवत होतो.
दोन मुली झाल्यानंतरही काही ना काही कारणावरून पती व सासू अर्चनाला छळत होते. याबाबत दिनांक १ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अर्चनाने आईकडे फोन करुन, होत असलेल्या त्रासाबद्दल कळविले.
नंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सासू मीराबाईने फोन करून अर्चना विहिरीत बुडून मयत झाल्याबाबत अर्चनाच्या आईस सांगितले.
याप्रकरणी मुलीची आई रंजना यांनी घरच्यांकडून होत असलेल्या जाचामुळे अर्चनाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याबाबत गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून शनेश्वर मच्छिंद्र नवले आणि त्याची आई मिराबाई मच्छिंद्र नवले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.