Ahmednagar Politics : सध्या भाजपत सक्रीय असलेले विवेक कोल्हे विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाहनातून प्रवास केला, तसेच ते मातोश्रीच्याही संपर्कात असल्याचे सातत्याने बोलले जात आहे.
मात्र कोणत्या पक्षात जायचे याबाबत अद्याप त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही त्यामुळे मात्र कार्यकर्ते संभ्रमात आहेत. तर दुसरीकडे महयुतीत कोपरगावची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे जाणार हे जवळपास निश्चित आहे.
आमदार आशुतोष काळे यांनी प्रचारही सुरू केला आहे; मात्र कोल्हे यांनी अजूनही भूमिका जाहीर केलेली नाही. महायुती सरकारमध्ये कोल्हे सहभागी आहेत. सगळीकडे उमेदवार विधानसभेच्या तयारीला लागले आहेत; मात्र महायुतीत कोल्हे यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह आहे.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी भाजपाकडून लढताना २९ हजारांपेक्षा अधिक मते घेतली. २०१९ला स्नेहलता कोल्हे यांनी पुन्हा शिवसेना भाजप युतीतून निवडणूक लढविली आणि अवघ्या ८०० मतांनी त्यांचा पराभव झाला. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कोल्हे यांचे संघटन मजबूत आहे.
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विवेक कोल्हे यांचे युवकांसोबताच तर बचत गटाच्या माध्यमातून स्नेहलता कोल्हे यांनी महिला व युवतींच्या संघटनेची अतिशय मजबूत बांधणी केली आहे; मात्र विधानसभा निवडणुकीकडे दुरूनच ते सर्व पाहात आहेत.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोन्हींकडून सोबत येण्याचे निमंत्रण असणार यात शंका नाही. असे असले तरी सध्या कोल्हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसतात. कोल्हे हातात मशाल घेणार, तुतारी की भाजप याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. कोल्हे यांनी अद्यापही याबाबत मौन सोडलेले नाही.
नगर जिल्ह्यात कोल्हे हे मोठे प्रस्थ आहे आज जरी त्यांची राजकीय अडचण झालेली दिसत असली तरी कोल्हे यांचा केवळ कोपरगावपुरता संपर्क नाही तर शिर्डी, वैजापूर, येवला, निफाड, नाशिकमध्येही त्यांनी आपला संपर्क वाढवला आहे. त्यामुळे कोल्हे यांचे उपद्रव्य मूल्य आणि उपयुक्तता दोन्हीही नाकारता येणार नाही. त्यामुळे कोल्हेंनी आपल्याकडे यावे यासाठी उद्धव ठाकरे किंवा शरद पवार दोघांकडूनही प्रयत्न सुरू असण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर संघर्षाच्या काळात स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी शरद पवार यांना मोलाची साथ दिली. आजही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर संघर्षाची वेळ आली आहे. अशा वेळेस कोल्हेंची साथ मिळावी यासाठी ते नक्कीच आग्रही असतील, तर दुसरीकडे कोपरगावची जागा शिवसेनेचीच होती.
२०१४ साली कोल्हे यांनी शिवसेनेचे तिकीट मागितले होते; परंतु काही कारणामुळे त्यावेळेस त्यांना भाजपचे तिकीट घ्यावे लागले, त्यामुळे ही जागा शिवसेनेच्या हातातून गेली, अन्यथा कोपरगाव विधानसभेची शिवसेनेची हॅट्रिक झाली असती. त्यामुळे शिवसेनाही कोल्हे यांची उपयुक्तता जाणून आहेत. मात्र आज मात्र कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.