अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेले तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी बदली विरोधात दाखल केलेली याचिका महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणने (मॅट) फेटाळून लावली आहे.
शासनाने राठोड यांची केलेली बदली योग्य व नियमाप्रमाणे असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि , तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांची ऑक्टोबर २०२० मध्ये नांदेड येथून नगर येथे बदली झाली होती.
पदभार स्वीकारल्यानंतर महिनाभरात राठोड यांची मोबाईलवरील संभाषणाची एक कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या व्हायरल क्लिपमुळे ते चांगलेच अडचणीत सापडले.
याप्रकरणी पोलीस विभागाने राठोड यांची खातेनिहाय चौकशी करत गृह विभागाकडे अहवाल सादर केला होता. त्यानंतर राठोड यांची नगरमधून बदली करण्यात आली होती. मात्र त्यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती. यावर राठोड यांनी ॲड. किशोर जगदाळे यांच्यामार्फत मॅटकडे दाद मागितली होती.
मॅटने दिलेल्या आदेशानुसार शासनाने राठोड यांना अमरावती येथे नागरी हक्क संरक्षणाचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती दिली होती. मात्र राठोड यांना नगर येथेच नियुक्ती हवी असल्याने त्यांनी मॅट न्यायालयात याचिका दाखल केली होती.
यावर न्यायमूर्ती ए. पी. कुर्हेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. दरम्यान याचिका कर्त्याच्याविरोधात गंभीर स्वरुपाच्या तक्रारी असून त्यांची बदली करताना नियमित प्रक्रिया राबविण्यात आली असल्याचे नमूद करत न्यायालयाने राठोड यांची याचिका फेटाळून लावली.