अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- देशाचे पहिले शिक्षणमंत्री, थोर स्वातंत्र्यसेनानी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष स्व. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान हे अतुलनीय आहे, असे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काळे बोलत होते. अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख होते.
यावेळी काळे म्हणाले की, मौलाना कलाम यांनी महात्मा गांधी यांच्या बरोबर स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम केले. खिलाफत चळवळ उभी केली. गांधीजींच्या असहकार चळवळ मध्ये सहभागी होत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अग्रभागी राहिले.
त्यांचे स्वातंत्र्य सेनानी म्हणून कार्य अतुलनीय आहे. अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष अज्जूभाई शेख म्हणाले की, मौलाना कलाम आझाद यांचे शिक्षण क्षेत्रातील काम मोठे आहे. त्यांच्या रूपाने मुस्लिम समाजाला देश पातळीवर शिक्षणासारख्या महत्त्वाच्या मंत्रिपदाची पहिली संधी मिळाली होती.
मुस्लिम समाजाला त्यांच्या गौरवशाली कार्याचा अभिमान आहे. यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हा सचिव अन्वर सय्यद, शरीफ सय्यद,
सेवादल महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, इम्रान बागवान, वाहिदभाई शेख, शाहीन बागवान, शेख परविन, निखत शेख, सादभाई शेख, रजिक कुरेशी, वजीर शेख आदींसह अल्पसंख्यांक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.