अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- पंधरा दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. दिल्लीत ही भेट झाली असून, या भेटीबद्दल आता तर्कवितर्क लावले जात आहेत.
यावेळी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेही बैठकीला उपस्थित होते. जवळपास अर्धा ही बैठक झाली. महत्त्वाचं म्हणजे शरद पवार आणि अमित शाह या दोघांची वेगळी 15 मिनिटे बैठक झाली. या वेगळ्या बैठकीत ‘वेगळ्या’ विषयावर खलबतं झाल्याचं सांगण्यात येत आहे.
शरद पवार यांनी दुपारी 2 च्या सुमारास संसदेत अमित शाहांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. अमित शाहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची ही पहिलीच भेट आहे. या बैठकीत साखरेची विक्री किंमत वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देण्याची मागणी अमित शहांकडे करण्यात आली. यावेळी गृहमंत्र्यांनी अशी माहिती दिली आहे की, लवकरच सरकार इथेनॉलबाबत नवीन धोरण आणण्याच्या विचारात आहे.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रायगडमध्ये एनडीआरएफ केंद्र उभारण्यासाठी आणि पूर आणि वादळातील विनाशापासून सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.