अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- बेलापूरमधील एका व्यापाऱ्याच्या अपहरणाची घटना चर्चेत असतानाच त्या व्यापाऱ्याचा मृतदेह सापडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान हिरण यांचे अपहरण करण्यात आले व त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विधानपरिषेदेत मुद्दा लावून धरला होता.
हिरण यांचे अपहरण व त्यानंतर त्यांची हत्या झाल्याची घटना अत्यंत निषेधार्ह असून, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी कठोर पावले उचलून अल्पसंख्य समाजाला न्याय मिळवून द्यावा,
अशी मागणी माजी खासदार व सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा यांनी केली आहे. १ मार्च रोजी हिरण (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) यांचे अपहरण झाले.
मात्र, पोलीस त्यांची सुटका करू शकले नाहीत. त्यानंतर ७ तारखेला सकाळी त्यांचा मृतदेह सापडला. या घटनेचा राज्यातून निषेध होत आहे. याबाबत दर्डा म्हणाले, ही घटना वेदनादायी आहे.
या प्रकरणात पोलिसांचा निष्क्रियपणा दिसून आला आहे. या प्रकरणाचा दुर्दैवाने तपास न होता हिरण यांचा मृतदेहच मिळाला. हे पोलिसांचे अपयश व निष्क्रियता असल्याची व्यापारी समाजाची भावना आहे.
आरोपी व सूत्रधारांना अटक होण्याच्या मागणीसाठी १० मार्च रोजी संपूर्ण राज्यात व्यापारी वर्ग व जैन समाजातर्फे निदर्शने केली जाणार आहेत.
तसेच व्यापारी काळ्या फिती लावून कामकाज करणार आहेत. एक आठवड्यात खुन्यांवर कारवाई न झाल्यास संपूर्ण देशात आंदोलन उभारण्याचा इशाराही महासंघाने दिला आहे.