अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू केले आहे. यातच जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन देखील कायम आहे.
दरम्यान आता याच अनुषंगाने जामखेड मध्ये व्यापारी वर्ग संतापला आहे. शांतता कमिटीच्या बैठकीत नागपंचमी सणामुळे शुक्रवारी तर शनिवारी रविवारी जनता कर्फ्यू यामुळे सलग तीन दिवस जामखेड शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय झाला. जामखेड शहरातील व्यापारी असोसिएशनने कडाडून विरोध केला.
आम्ही तीन दिवस दुकाने बंद ठेवणार नाहीत. शनिवार व रविवारचा जनता कर्फ्यू पाळू पण शुक्रवारी दुकाने उघडेच ठेवू असा निर्धार नायब तहसीलदार राजेंद्र लाड यांना दिलेल्या निवेदनातून व्यक्त केला आहे. एक तर कोरोनामुळे गेली पंधरा सोळा महिन्यापासून व्यापारी होरपळलेला आहे.
व्यापाऱ्यांना लाईट बिल, नोकरांचा पगार, जागेचे भाडे चुकत नाही आणि बँकेचे हप्ते वेळेवर जात नाही. त्यामुळे प्रशासनाने व्यापाऱ्यांबाबत निर्णय घेताना व्यापार्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा. शुक्रवारी आम्ही बंद ठेवणार नाहीत.
अशी आक्रमक भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. जामखेड शहरातील तीन दिवस दुकाने बंदचा निर्णय चुकीचा असल्याने शनिवार, रविवार बंद ठेवावे. शुक्रवारी दुकाने उघडी ठेवावी, असे निवेदन जामखेड येथील व्यापारी संघटनांनी जामखेड तहसील कार्यालयाकडे दिले.