दशक्रिया विधीत वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- निमगाव वाघा (ता. नगर) येथे भानुदास काळे यांच्या दशक्रिया विधीत वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तर अमरधाम मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व खंडोबा तरुण मंडळाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

अमरधाममध्ये झालेल्या या सामाजिक उपक्रमाप्रसंगी सुभाष काळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, अंकुश आतकर, दिपक काळे, मयुर काळे, बाबासाहेब काळे, बबन जाधव, मारुती काळे, अरुण काळे, भाऊसाहेब काळे, दिलीप काळे, ज्ञानदेव काळे, रामदास काळे आदी उपस्थित होते.

पै. नाना डोंगरे म्हणाले की, जीवन चक्रानुसार मरण अटळ आहे. पण घरातील व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या आठवणी कायम स्मरणात राहण्यासाठी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षरोपण हा सर्वोत्तम पर्याय आहे. प्रत्येकाला अंत्यविधीसाठी लाकडे लागणार आहे.

याची तजवीज जिवंत असताना झाडे लाऊन केली पाहिजे. यामुळे पर्यावरणाचा समतोल देखील साधला जाणार आहे.

सर्व धर्मात निसर्ग व स्वच्छतेला महत्त्व देण्यात आले असून, निसर्गाचे रक्षण करणे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वच्छता अभियानाद्वारे अमरधाममध्ये स्वच्छता करुन वाढलेले गवत, काटेरी झाडे, झुडपे हटविण्यात आले. या सामाजिक उपक्रमाबद्दल गावचे सरपंच रुपाली जाधव, उपसरपंच अलका गायकवाड व ग्रामसेवक गोवर्धन राठोड यांनी आयोजकांचे आभार मानले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24