अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यानंतर आज पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. त्यानंतर आता हवामान खात्यानं काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जाहीर केला आहे.
आज कोकण आणि घाट परिसरात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. आज पुणे सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंदुधुर्ग या सहा जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे.
येत्या चोवीस तासांत याठिकाणी वेगवान वाऱ्याच्या साथीनं मुसळधार पावसाची शक्यता आहे. संबंधित जिल्ह्यात 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान मराठवाड्यात ढगफुटी सदृश्य कोसळलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे.
निसर्गाच्या प्रकोपामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाला आलेला घास हिरावला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गुडघाभर पाणी साचल्यानं सर्व पिकं जळून गेली आहे. यानंतर आता राज्यात पुन्हा पावसानं विश्रांती घेतली आहे.
पण विकेंडनंतर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 12 सप्टेंबरनंतर अनेक जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज आणि येलो अलर्ट दिले आहेत. 13 आणि 14 सप्टेंबर रोजी राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.