अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी शहरात पुन्हा मायक्रो कंटेनमेंट झोन करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महापालिकेत आरोग्य विभागाची बैठक झाली.
या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यावर भर देण्याचे यावेळी ठरले. या बैठकीला उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, नगरसेवक अनिल शिंदे,
माजी नगरसेवक अनिल बोरूडे, संभाजी कदम, गणेश कवडे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, उपायुक्त यशवंत डांगे, प्रभारी वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर, डॉ. नलिनी थोरात, गणेश मोहळकर, एस. व्ही. चेलवा,
माधुरी गाडे, आरती डापसे, आएशा शेख आदी उपस्थित होते. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या दहा दिवसांत शहरातील रुग्णसंख्या वाढत आहे.
तिसरी लाट रोखण्यासाठी उपायोजना करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. महापालिकेचे ५०० बेडचे हॉस्पिटल सुरू करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
विनायक नगर, बुरूडगाव रोड या भागातील नागरिकांची घरोघर जावून कोविडची तपासणी करण्याच्या सूचना उपमहापौर भोसले यांनी यावेळी केल्या.