अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ च्या दृष्टीने हप्त्यातील दोन दिवस कडक लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर नगर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र नागरिकांनी याला 100 टक्के प्रतिसाद देत कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आला.
राज्यात करोनाचा प्रकोप झालेला पाहायला मिळत आहे. राज्यातल्या विविध शहरांत करोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतेय. राज्यातील प्रत्येक शहरात करोनाचा स्फोट होताना दिसतोय.
त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी आणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्याच शासन आदेशानुसार जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शासन आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी तर दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
या आदेशाचे पालन करत पोलीस यंत्रणेकडून नाकेबंदीत प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाते. कुठे जात आहात आणि काय कामासाठी बाहेर पडले याची माहिती घेतली जात होती.
करोना संसर्गाची दुसरीलाट अतितीव्र स्वरुपात असून यामध्ये दैनदिन करोना बाधित रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध करण्यासाठी ब्रेक द चेन मिशन अंतर्गत जमावबंदी लागू राहील.
नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर फिरू नये. शहरातील वैद्यकीयसेवेसह अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद ठेवणे बंधनकारक आहे.