अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- राफेल फायटरजेटच्या व्यवहारात गौडबंगाल असून करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी सातत्याने उघड केले. या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली.
परंतु मोदी सरकारने चौकशी न करता प्रकरण गुंडाळले. फ्रान्समध्ये राफेल व्यवहाराची चौकशी होते, मग भारतात का नाही, असा सवाल करून सत्य जनतेसमोर येण्यासाठी चौकशी करा, अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
थोरात म्हणाले, यूपीए सरकारच्या काळात १२६ राफेल फायटरजेट विमाने प्रत्येकी ५५६ कोटी रुपयांनी खरेदी करण्याचे निश्चित होते. मात्र मोदी सरकारने याच फायटर जेटसाठी १६७० कोटी रुपये देऊन व्यवहार केला.
व्यवहार करताना अनेक बाबींना फाटा दिला गेला. मोदींच्या उद्योगपती मित्रांचा फायदा व्हावा, यासाठी या क्षेत्रातील अनुभव नसलेल्या अनिल अंबानी कंपनीला कंत्राट दिले. या व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचे राहुल गांधी यांनी वारंवार सांगितले.
परंतु याकडे मोदी सरकारने दुर्लक्ष करत प्रकरण गुंडाळले. राफेल व्यवहारात गडबड झाल्यानेच फ्रान्समध्ये चौकशी सुरू आहे. भारतात मात्र पांघरुण घालण्याचे काम होत आहे.