अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील प्रादेशिक नळ योजने अंतर्गत येत असलेल्या दवणगाव सात गाव पाणी पुरवठा जोजनेचे वीज पुरवठा ‘कनेक्शन कट’ केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दवणगाव, संक्रापूर, पिंपळगाव फुणगी, गंगापूर, आंबी, अंमळनेर, केसापूर या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला.
त्यामुळे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याच तालुक्यातील या गावांचा पिण्याच्या पाण्यावाचून घसा कोरडा पडला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना योजनेचे सदस्य तथा गंगापूरचे लोकनियुक्त सरपंच सतिष खांडके यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून सुरळीत चाललेल्या दवणगाव सात गाव पाणी पुरवठा जोजनेचा वीजपुरवठा महावितरणने थकीत वीज बिलाचे कारण देऊन खंडित केला आहे.
सण २०१८-२०१९ व सण २०१९ ते २०१९-२०२० या आर्थिक वर्षांमध्ये १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून दवणगाव, संक्रापूर, पिंपळगाव फुणगी, गंगापूर, आंबी, अंमळनेर, केसापूर या गावांकडून प्रत्येकी दोन लक्ष रुपये वीज बिलापोटी परस्पर वळते करून घेतले.
त्याचा हिशेब अद्याप पावेतो दिलेला नाही. तसेच दरवर्षी नियमित मिळणारे प्रादेशिक नळ योजनेचे वार्षिक अनुदान अपुरे मिळाले आहे. त्यातच कोरोनाने ग्रामीण भागात थैमान घातले.
लोकांना रोजगार नसल्याने उत्पन्नाचे साधन हिरावले. आर्थिक परिस्थिती ढासळल्याने पाणीपट्टी वसुलीस अडचणी येत आहेत.
याप्रकरणी राज्याचे उर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी लक्ष घालून एम.एस.सी.बी अधिकाऱ्यांना दवणगाव सात गाव पाणी पुरवठा जोजनेचा वीजपुरवठा सुरळीत करून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी लाभधारक ग्रामस्थांकडून केली जात आहे.