अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय मुद्द्यांवरून तसेच वेगवेगळ्या कारणावरून आरोप – प्रत्यारोप सुरूच असतात. तसेच कार्यपद्धतीवरून देखील तू तू में में होत असतेच.
नुकतेच नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांनी एका मुद्द्यावरून नाव न घेता राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा चांगलाच शाब्दिक टोला लगावला आहे.
राहुरी तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांवर मंत्र्यांचा दबाव व दहशत दुर्दैवी आहे. राज्य सरकार पूर्णपणे केंद्राच्या पैशावर अवलंबून आहे. परंतु महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी व मंत्री केंद्र सरकारच्या निधीतील कामे राज्य सरकारने केल्याचे भासवून, दिशाभूल करतात, असा आरोप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला.
वांबोरी येथे पत्रकार परिषदेत खासदार डॉ. विखे बोलत होते. यावेळी खासदार डॉ. विखे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. केंद्र सरकारच्या कुठल्याही निधीतील कामाचे भूमिपूजन व उद्घाटन मला न सांगता केले. तर, लोकसभा स्पीकरकडे तक्रार करून, अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
राहुरीतील अधिकार्यांनी कार्यपद्धती बदलावी. २०१९ पूर्वी प्रशासकीय मंजुरी, निविदा प्रक्रिया झालेल्या कामांची चालू महिनाअखेर गावनिहाय यादी द्यावी, असेही खासदार डॉ. विखे यांनी ठणकावून सांगितले.
तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, प्रत्येक गोष्टीत लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप दुर्दैवी आहे. राज्यमंत्र्यांचे नाव न घेता विखे यांनी शाब्दिक टोला लगावला आहे.