अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो. तसेच कोणीही कायमचा मित्रही नसतो. त्यामुळे कोणताही चमत्कार होऊ शकतो, असे सूचक वक्तव्य माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. विखेंच्या या वक्तव्यामुळे राजकरणात मोठी खळबळ उडाली आहे.
शनिवारी आ. विखे पाटील नगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी विखे पाटील यांना प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनीही युतीच्या दृष्टीने सूचक वक्तव्य केले.
ते पुढे म्हणाले, सध्या राज्यात महाविकास आघाडीची जी मोट बांधली गेली आहे, ती केवळ सत्तेसाठी आहे. त्यात वैचारिक भूमिका नाही. सत्ता असो किंवा नसो शिवसेना आणि भाजप यांचा पारंपरिक संबंध आहेत. ते एकत्र येत असतील तर त्याचे स्वागत केले पाहिजे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी जे विधान केले आहे, ते त्यांचे व्यक्तीगत असले तरी राजकारणात कायमस्वरूपी मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो. त्यामुळे चमत्कार होऊ शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भविष्यातील सहकारी असे वक्तव्य एका भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या कार्यक्रमात केले होते.
या आधी भाजपाकडूनच अशी वक्तव्ये होत होती. परंतू ठाकरेंनीच असे वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावरून राज्यात सत्तांतर होते की काय किंवा शिवसेना सत्तेतील वाटेकरी बदलते की काय अशा चर्चा रंगल्या होत्या.