अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- महावितरण कंपनीने महापालिकेची कुठलीही परवानगी न घेता शहरातील रस्त्यांची मनमानी पद्धतीने खोदाई करून रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे, त्यामुळे संबधितांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे
आदेश महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी आ.संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.
नगर शहरात मुख्यत: नगर महाविद्यालय परिसर, कोठी चौक आणि स्वस्तिक चौक इत्यादी परिसरात महावितरण विभागाकडून रस्त्याची खोदाई गेल्या अनेक दिवसांपासून व सध्याही सुरू आहे. महावितरण विभागाच्या या अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून या ठिकाणाहून प्रवास करावा लागतो.
तसेच कुठल्याही शासकीय यंत्रणेची परवानगी न घेता मनमानी पध्दतीने कामकाज महावितरण विभागाकडून सुरू आहे. त्यामुळे महावितरण विभाग व या संबंधित अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारे कायदा व शासकीय यंत्रणेचा धाक राहिलेला नाही, असेच त्यांच्या कामकाजातून दिसून येते.
ठिकठिकाणी खोदण्यात आलेल्या खड्डयामुळे छोटे मोठे अपघातही घडलेले आहे व सदरचा भाग हा नगर पुणे रस्त्यालगत असल्याने मोठा अपघातही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जीवीत व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान मनमानी पध्दतीने कामकाज करणाऱ्या महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर महापालिकेच्या रस्त्याचे नुकसान केल्यामुळे गुन्हा दाखल करून सदरच्या अधिकाऱ्यांवर दडांत्मक रक्कम वसूल करावी.
तसेच याबाबत महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिर्कायांना गुन्हा दाखल करणेबाबत आदेशित करावे, असेही आ.संग्राम जगताप यांनी म्हंटले आहे.