अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर | आमदार लहू कानडे यांनी विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला असून आता मतदारसंघामध्ये जोरदार विकास कामे होतील असे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
तांबे श्रीरामपूर भेटीवर आले असता बोलत होते. उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये दीडशे बेड्सचे विस्तारीकरण केले जात आहे, अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली.
यावेळी आमदार लहू कानडे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, सचिन गुजर, इंद्रनाथ थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे, बाबासाहेब दिघे, पंचायत समिती सदस्या डॉ. वंदना मुरकुटे, अरुण नाईक, अशोक कानडे उपस्थित होते. आमदार तांबे म्हणाले, आमदार कानडे यांना विकासाच्या प्रश्नांची माहिती आहे.
त्यांनी अनेक वर्षे प्रशासनामध्ये काम केले आहे. त्यामुळे त्यांना विकासकामे करताना मंत्रालयामध्ये कोणत्याही अडचणी येत नाहीत. कुठे बटन दाबायचे हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे.
कानडे म्हणाले, मतदारसंघामध्ये आपण रस्त्यांच्या कामांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. तालुक्यातील एमआयडीसीच्या विकासाकरिता दळणवळणाची साधने उपलब्ध करून देत आहोत.
त्याचाच भाग म्हणून बाभळेश्वर फाटा ते नेवासे फाटा या १३७ कोटी रुपयांच्या महामार्गाचे काम हाती घेतले आहे. समीन बागवान यांनी सूत्रसंचालन केले.