अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- राम मंदिर निर्माण हा ऐतिहासिक निर्णय भाजप सरकारचा असल्याने इतर पक्षांना याबद्दल नक्कीच आक्षेप असणार यात काहीच वाद नाही, कारण यांना हिंदुत्व ही अस्मिता महत्त्वाची नसून सत्तेचे राजकारण महत्त्वाचं आहे. काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी राममंदीरासाठी देणगी गोळा करणाऱ्या कार्यकत्यांर्ना खंडणीखोर म्हटले.
अशा चुकीच्या वक्तव्याबद्दल आ.कानडे यांनी जनतेची माफी मागावी,अशी मागणी उत्तर नगर जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी केली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जिल्हाध्यक्ष गोंदकर यांनी म्हटले आहे, राम मंदिर निधी अभियानावर टीका करणाऱ्यांनी आधी स्वकर्तुत्वावर केलेल्या गोष्टींचाही आढावा घ्यावा, मग अशा राष्ट्र निर्मितीच्या पवित्र कार्यावर आक्षेप घ्यावा.
राम मंदिरासाठी देत असलेला निधी योग्य ठिकाणी पोहोचणार आहे. याची सामान्य माणसाला खात्री आहे. त्यामुळेच सामान्य माणसांकडूनही राम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे . अशाच वेळी काँग्रेसचे आमदार राम मंदिर निधी अभियानावर ताशेरे ओढत आहेत.
निधी योग्य ठिकाणी जातोय की नाही, याची चिंता काँग्रेस पक्षाला वाटू लागली आहे. राम मंदिरासाठी होत असलेले निधी संकलन पूर्णत: पारदर्शक पद्धतीने होत आहे. निधी संकलन करणारे कार्यकर्ते त्याची पावती त्वरीत निधी देणाऱ्याकडे सुपूर्त करीत आहेत.
हे चित्र बघून काँग्रेसला मतांच्या राजकारणासाठी श्रीराम मंदिरासारख्या पवित्र कार्यास हातभार न लावता उलट त्यावर आक्षेप घेत त्यांची मतांच्या राजकारणासाठी होणारी घालमेल दिसून येत आहे. यामुळे काँग्रेसचे आ.कानडे यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी गोंदकर यांनी केली आहे.