अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-येत्या दोन ते तीन दिवसांत रेमडेसिवीर इंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल, टंचाई भासणार नाही, असा विश्वास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. प्राणवायूचा पुरवठाही सुरळीत होईल, असेही मंत्री थोरात म्हणाले.
येथील गणेश मंगल कार्यालयात मंत्री थोरात यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार सकाळी काेरोना आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
आमदार नीलेश लंकेे, आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते, सभापती गणेश शेळके, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, संभाजी रोहोकले,
प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
आमदार नीलेश लंके करोना काळात चांगले काम करीत आहेत. त्यांनी सुरू केलेल्या १ हजार १०० खाटांच्या आरोग्य मंदिरास आपण भेट देणार आहोत. इतके मोठे काम करताना मात्र ते मास्कचा वापर करीत नाहीत.
आमदार लंके यांचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी आहे. ते रुग्णालयात भरती झालेले तालुक्याला आणि आम्हाला परवडणारे नाही. आमदार लंके यांनी मुखपट्टीचा वापर करण्याबरोबरच गर्दीत जाणे टाळायला हवे, असेही मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, कोरोना संसर्गाची पहिली लाट ओसरल्यावर रुग्णसंख्या कमी झाली. रेमडेसिवीरची मागणीही कमी झाली. परिणामी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादकांनी उत्पादन कमी केले.
संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिवीरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतर उत्पादन वाढवण्यात आले असले तरी उत्पादनानंतर १५ दिवसानंतर रेमडेसिवीर वापरण्यायोग्य (मॅच्युअर) होते.
पंधरा दिवसांचा कालावधी येत्या दोन तीन दिवसांत संपणार असून त्यानंतर मात्र रेमडेसिवीरचा पुरवठा मुबलक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्राणवायूचा तुटवडाही येत्या काही दिवसांत जाणवणार नाही, अशी ग्वाही मंत्री थोरात यांनी दिली.
पारनेर तालुक्याचा मुंबई, पुण्याशी मोठा संपर्क असल्याने तेथून गावी आलेल्या पाहुण्यांना सक्तीने विलगीकरणात ठेवण्याच्या सूचना थोरात यांनी तालुका प्रशासनाला दिल्या.
तालुक्यात अधिकारी तसेच पदाधिकारी यांच्या समन्वयातून काेरोना प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवता येत असल्याचे सांगतनाच आमदार नीलेश लंके तसेच अधिकाऱ्यांच्या कामाचेही मंत्री थोरात यांनी कौतूक केले.
पारनेर तालुक्यात मात्र लोक फिरताना दिसत नाहीत. ३० तारखेपर्यंत अशीच शिस्त पाळली, तर पारनेर तालुक्याची रुग्णसंख्या सर्वात कमी असेल. पारनेर शहरासह भाळवणी, टाकळी ढोकेश्वर व जवळा येथील रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याबद्दल
मात्र थोरात यांनी चिंता व्यक्त केली. सुरुवातीस देशातील एकूण रुग्णसंख्येच्या ६० टक्के रुग्ण राज्यात होते. आज रुग्णसंख्या ३० टक्क्यांपर्यंत खाली आली. इतर राज्यात मात्र रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे थोरात यांनी निदर्शनास आणून दिले.
आमदार लंके म्हणाले, काेरोना संसर्गावर मात करण्यासाठी भाळवणी येथे कोविड उपचार केंद्र सुरू केले. त्यासाठी शासकीय पातळीवर मदत गरजेची आहे.
प्राणवायू, रेमडेसिवीर उपलब्ध होत नाहीत. औषधे दुपारपर्यंत संपतात. औषधांचा मुबलक पुरवठा करण्याची मागणी लंके यांनी केली.