अहमदनगर Live24 टीम, 12 जुलै 2021 :- मी बाप नव्हे तर जनतेचा सेवक आहे.समाजकारणात, राजकारणात आल्यापासून मी माझे जीवन जनतेसाठी अर्पण केले आहे.ज्या दिवशी मी स्वतःला आमदार समजेल त्यावेळी माझी जनतेसोबत असलेली नाळ तुटेल असे खणखणीत प्रतीउत्तर आमदार नीलेश लंके यांनी माजी आमदार विजय औटी यांना दिले.
तालुक्यातील विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी माजी आमदार औटी यांनी मी सर्वांचा बाप असल्याची दर्पोक्ती केली होती.आमदार नीलेश लंके यांनी माजी आमदार औटी यांच्या दर्पोक्तीचा चांगलाच समाचार घेतला.
ज्यांना स्वतःच्या माणसांना करोना संकटात वाचवता आले नाही ते सर्वसामान्यांचे जीव काय वाचवणार असा सवाल आमदार नीलेश लंके यांनी उपस्थित केला.
पंचायत समितीचे माजी सभापती राहूल झावरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील करंदी येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आमदार लंके बोलत होते.
गेल्या आठवड्यात माजी आमदार विजय औटी यांनी आमदार लंके यांच्या कार्यपद्धतीवर घणाघाती टीका करीत आपण आमदार असतो तर,करोना संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंपैकी किमान ५० टक्के जीव वाचवले असते असा दावा केला होता.
आमदार लंके म्हणाले की,करोना संकटकाळात जे सहा महिने बिळात लपून बसले होते ते काय बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही.माझा पींड काम करण्याचा आहे.मी कामातच राम मानणारा आहे.
करोना संसर्गाच्या दोन्ही लाटांमध्ये उभारलेल्या कोवीड उपचार केंद्रात तब्बल १७ हजार १०० रुग्ण करोनामुक्त झाले.प्रत्येकी १ लाख रुपये खर्च आला असता असे गृहीत धरले तरी तालुक्यातील सर्वसामान्यांचे अब्जावधी रुपये वाचले.
ज्यांना स्वतःच्या जवळच्या माणसांना वाचवता आले नाही ते दुसऱ्यांना काय वाचवणार असा उपरोधिक सवाल करतानाच माजी आमदार औटी यांनी केलेल्या टिकेचा आमदार लंके यांनी खरपूस समाचार घेतला.