अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- कोरोनाच्या संकट काळात अनेक ठिकाणी रुग्नांना उपचारासाठी सुविधा मिळाल्या नाही. रुग्णांसह कुटुंबीयांची मोठी हेळसांड झाली, अनेकांना आपल्या प्राणाला देखील मुकावे लागले.
मात्र यातच नगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी हजार बेड क्षमता असलेलं कोविड सेंटर सुरु करून रुग्णांना जगण्याचा एक आधारच दिला. यामुळे लंके यांची जनमानसात एक मोठी प्रतिमा निर्माण झाली.
आजही आमदार लंकेची क्रेझ कायम असून त्यांना दुसऱ्या मतदारसंघातून कार्यक्रमाची निमंत्रणे येऊ लागलीत. गावोगावी त्यांची पाद्यपूजा होते आहे. त्यांच्यावर पुष्पवृ्ष्टी होते आहे. कोविडच्या काळात त्यांनी केलेल्या कामाची अशा रितीने पावती मिळते आहे.
संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे शनैश्वर जंयतीनिमित्त नागरिकांनी आयोजित रक्तदान शिबिराच्या उदघाटनासाठी आमदार लंके यांना बोलावण्यात आलं होतं. या प्रसंगी तरूणांनी लंके यांचे पाय धुऊन व मस्तकी पुष्ष वर्षाव करीत पूजन केले.
या अनोख्या पाहुणचाराची परिसरात चर्चा सुरू आहे. शिबिरात सहभागी झालेल्या पंच्चावन्न तरूणांनी रक्तदान केले. यावेळी आमदार लंके म्हणाले, भले मी राजकारणी जरी असलो तरी शंभर टक्के समाजकारण करतो. म्हणून मी तालुकासह संपूर्ण महाराष्ट्राचा आमदार आहे.
माझी गाडी जनता बससारखी आहे.हात दाखवा नि थांबवा. यापुढील काळात गाव कारभा-यांनी ग्रामआरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. संपत्ती पेक्षा सेवाभाव अंगिकारणे अशा अपेक्षा लंके यांनी व्यक्त केल्या.