अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या जेजुरी येथील भाषणावरून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी टीका केली होती.
या मुद्द्यावरून कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांना शाब्दिक उत्तर देखील दिले होते. आता याच प्रकरणावरून पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीकेचा भडीमार होत असताना याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी टीकाकारांना चक्क नम्र विनंती केली आहे.
जेजुरी येथील कार्यक्रमातील पवार यांच्या भाषणावर अलीकडेच टीका होत आहे. त्यामध्ये पवार यांनी अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात झाला,
असे वक्तव्य केल्याची क्लीप व्हायरल करून यातून अहिल्यादेवी यांचा अवमान झाल्याची टीका केली जात आहे. त्याला उत्तर देताना लंके म्हणाले, ‘
ज्यांच्या राजकीय कारकीर्दीस पन्नास वर्षे पूर्ण झाले आहेत, अशा देशाच्या नेत्यावर दिशाहीन झालेले लोक टीका करत आहेत. पवार यांच्या जेजुरीतील भाषणाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे.
देशाचे नेतृत्व करताना येथील सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक अभ्यास पवारांएवढा कोणाचाही नाही. जे पवार यांच्यावर टीका करतात, त्यांची वैचारिक पातळी घसरलेली आहे,
अशा शब्दांत लंके यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. आमदार लंकेचे टिककरांना भावनिक आवाहन राज्यातील सर्व टीकाकारांना मी नम्र विनंती करतो की, पवारांसारख्या व्यक्तीमत्वावर कोणीही हेतूपुरस्पर,
राजकीय फायद्यासाठी टीका करू नये. त्यांच्यावर खोटे आरोप करून बदनामी करणे चुकीचे आहे. त्यामुळे मी सर्वांना नम्र विनंती करतो की, हे जे राजकारण चालविले आहे, ते थांबविणे गरजेचे आहे, असेही लंके यांनी म्हटले आहे.
याप्रकरणी आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया शरद पवार यांच्या जेजुरी येथील भाषणावरून टीका करणाऱ्यांनी ते नीट ऐकलेले दिसत नाही. या भाषणातून आणि यापूर्वीही पवारांनी अहिल्याबाई होळकर यांचा सन्मानच केला आहे.
या मतदारसंघातून निवडणूक लढण्यापूर्वीच त्यांनी मला अहिल्यादेवींबद्दल सांगून जबाबदारीने काम करण्याचा सल्ला दिला होता. आम्ही अहिल्यादेवींचा सन्मानच करत आलो आहोत.