अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- शरीर थकले तरी मन थकू देऊ नका, आज प्रत्येकाला आधाराची गरज आहे. भाळवणीचे आरोग्य मंदीर नसते तर गोरगरीब जनतेचे हाल झाले असते. अनेकांनी दागीने मोडून रुग्णालयांची बिले भरली.
जे रुग्ण येथे उपचार घेउन गेले त्या रुग्णांच्या नातेवाईकांचेही कल्याण झाले. समाजासाठी झटणारी माणसे फार कमी असून 288 आमदारांमध्ये समाजासाठी झटणारे आ. लंके हे राजकारणातील अमिताभ बच्चन असल्याचे हभप इंदोरीकर महाराज म्हणाले.
आ. लंके यांच्या मार्गदर्शनाखालील भाळवणी येथील शरद पवार आरोग्य मंदिरात श्रावण मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये इंदोरीकर यांनी कीर्तनसेवा अर्पण केली. त्यावेळी त्यांनी आ. लंके यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले.
देव हा विशिष्ट लोकांकडून विशिष्ट काम करू घेतो. जी दगडं घाव सहन करतात तिच देवाच्या मूर्तीसाठी वापरली जातात. भाळवणीच्या आरोग्य मंदिरातून एक माणूस बरा होऊन गेला तर त्याच्या मुखातून पडणारा शब्द काशीच्या अमृतापेक्षाही मोठा आहे. अशा शब्दांमध्ये इंदुरीकर महाराज यांनी लंकेचे कौतुक केले.
रुग्णांना लुटणाऱ्या डॉक्टरांचे कधी चांगले होणार नाही….
करोनाची लाट ही गरिबांना लुटणार्यांसाठी येणार आहे. करोनामुळे माणसं भांबावली त्यामुळे डॉक्टरांनीही रुग्णांना लुटण्याचा तडाखा उठविला. ज्यांनी रुग्णांना लुटलं त्यांचे वाटोळे होणार. गरिबांचा तळतळाट कधी कोणत्या रूपाने बसेल हे सांगता येणार नाही.