अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- काेरोना काळात मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामामुळे जिल्ह्यातील प्रस्थापीत धास्तावले आहेत. माझ्यावर बिनबुडाची टीका सुरू झाली आहे.
पण मी घाबरत नाही. वेळ आलीच तर मी संपूर्ण जिल्ह्यात सक्षम असल्याचे दाखवून देईल, असे ठणकावून सांगताना आमदार नीलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांना अप्रत्यक्षरित्या खुले आव्हान दिले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत तालुक्यातील पळशी येथे परिसरातील गावांतील अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांना खावटी अनुदान योजनेअंतर्गत किराणा व अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विविध समित्यांच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला.
राजूर येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी अशोक काळे, सुजाता शेरखाने, आत्मा समितीचे अध्यक्ष राहूल झावरे, राष्ट्रवादी विदयार्थी माहिती व तंत्रज्ञान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे, ठकाराम लंके, बाळासाहेब लंके, बापूसाहेब शिर्के, संदीप चौधरी,
अजय लामखडे, दत्ता कोरडे, जगदीश गागरे, सत्यम निमसे, योगेश शिंदे, संदीप रोहकले, सुरज भुजबळ, बंडू कुलकर्णी, श्रीरंग रोकडे, अप्पासाहेब शिंदे, गणेश मधे, मिठू जाधव, गणेश हाके, प्रविण गागरे, सुखदेव चितळकर आदी यावेळी उपस्थित होते.
खासदार विखे यांनी नगर व श्रीगोंदे येथे बोलताना आमदार लंके यांच्यावर जोरदार टीका केली. आमदार लंकेे करोना संकटकाळात करीत असलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
आम्हीही भरपूर काम केले पण गाजावाजा केला नाही, असा खासदार विखे यांचा सूर होता. या पार्श्वभूमीवर आमदार लंके नगर लोकसभा मतदारसंघातील खासदार विखे यांचे प्रबळ विरोधक असतील अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेच्या अनुषंगाने आमदार लंके यांच्या वक्तव्याला विशेष महत्त्व आले.