अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या असून अनेक ठिकाणी सरपंच तसेच उपसरपंच पदांची घोषणा देखील झाली आहे.
मात्र राजकीय मतभेदातून आजही काही ठिकाणी निवडणुकांनंतर वाद , हाणामारी, जीवघेणे हल्ले अशा घटना घडल्या आहेत. असाच काहीसा प्रकार पारनेर तालुक्यात घडला आहे.
भाळवणी सरपंच निवडीच्या वादातून दोघांनी एकावर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथे मंगळवारी सकाळी घडली.
जखमीस नगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. शशीकांत अडसूळ असे या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या हल्ल्यात अडसूळ यांच्या मानेस गंभीर जखम झाली आहे.
त्यांना नगरच्या शासकिय रूग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अडसूळ यांच्या प्रकृतीस कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेस पोलीस प्रशासनाने दुजोरा दिला असून तेथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.