अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- सोशल मीडियावर सध्या लंके यांचाच बोलबाला सुरू आहे. ते पारनेर-नगर तालुक्याचे आमदार असले तरी महाराष्ट्रभर त्यांचे चाहते आहेत. कै. आर. आर. पाटील यांच्यासोबत त्यांची तुलना होऊ लागलीय.
कोरोना काळातील कामामुळे लंके मीडियाच्या केंद्रस्थानी आलेत. जे साखर कारखानदारांना, पिढीजात राजकारण करणाऱ्यांना जमलं ते लंके यांनी करून दाखवल्याने त्यांची वाहवा होते आहे.
राज्यात सध्या पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या कार्याचे कौतुक होताना दिसत आहे.लंके यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये एक हजार बेड्सचं कोव्हिड केअर सेंटर सुरू केलं आहे.
या ठिकाणी शंभर ऑक्सिजनच्या खाटा देखील आहेत. लंके हे स्वतः या कोव्हिड सेंटरमध्ये थांबून रुग्णांची काळजी घेत असल्याचे अनेक व्हीडिओ समोर आले आहेत.
माझं काय व्हायचं ते होईल पण ज्या जनतेने मला निवडून दिले आहे तीच जनता आज घाबरून बसली आहे. आणि मी सुद्धा जर मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाकडे मदतीसाठी जायचे.
त्यामुळे मी असुरक्षित असलो, मला काही झाले तरी चालेल पण माझे लोक सुरक्षित असले पाहिजेत, हे शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे आहेत.
अहमदनगर मधील पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे तब्बल १ हजार १०० बेडचे हे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. यामध्ये शंभर ऑक्सिजन बेड आहेत.
निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर ते निवडून आले.
पहिल्यांदाच ते आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी तिनवेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या विजय औटी यांचा पराभव केला.
लंके यांचे सध्या जिल्ह्यातील व विशेषतः नगर दक्षिणेतही प्रत्येक तालुक्यात समर्थक निर्माण झाले आहेत नीलेश लंके यांच्या नावाची आतापासून चर्चा होऊ लागलीय. जिल्हाभर तसेच राज्यभर लंके यांची हवा असल्याने राष्ट्रवादीच्याने नेत्यांना पुढची लोकसभा निवडणूक आतापासूनच सोपी वाटू लागलीय.
नगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, त्यांना तिथे तगडा उमेदवार मिळत नाही. भाजपचे दिलीप गांधी यांच्यामुळे बालेकिल्ला बनला. आता विखे घराण्यातील डॉ. सुजय विखे पाटील हे प्रतिनिधीत्व करीत आहेत. विखे-पवार वादाला याच मतदारसंघातील उमेदवारीची किनार आहे.
आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटर मुळे हजारो रुग्णांना दिलासा मिळाला आहे. आमदार लंके स्वतः रात्रंदिवस या कोविड सेंटर मधील रुग्णांची विचारपूस करत आहेत.
इथे येणाऱ्या प्रत्येक कोरोना रुग्णांची ते आस्थेने विचारपूस करतात. त्यामुळे लंके यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. स्वतः आमदारच आपल्या तब्बेतीची काळजी घेत आहे आणि आपली विचारपूस करत आहे हे बघून रुग्णांना देखील मोठा आधार मिळत आहे.