अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- पारनेर शहरात ३९ वा दुर्गामाता नवरात्र महोत्सव साजरा करत असताना विजयादशमीच्या आरतीचा मान रिवाजाप्रमाणे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना होता. आ. नीलेश लंके यांना मंडळाने आमंत्रणही दिले.
या दिवशी त्यांचे तब्बल २२५ कार्यक्रम होते. सायंकाळचा कार्यक्रम तर मोहटादेवी संस्थानने कधीच बुक करून ठेवला होता.
पारनेर शहरातील मानाच्या आरतीला उपस्थित राहील हा शब्द त्यांनी दिला, व तो पाळलाही. नेहमीच लोकांच्या गराड्यात असणारे, दिवसभर कार्यक्रमात व्यस्त असतानाही आमदार १५ मिनिटे अगोदरच पारनेरमध्ये पोहचले.
आरतीला पोहचलेल्या आमदार लंके यांच्या चेहऱ्यावर प्रचंड थकवा जाणवत होता. त्यांना तर ९ दिवसांचा उपवास होता. त्या काळातही रोजचे कार्यक्रम सुरूच होते.
पायात चप्पल नाही, उपवास सोडला की नाही, हे देखील माहिती नाही. या कार्यक्रमाला आमदारांचे वडील, आई देखील आले होते. आरतीनंतर थकलेल्या लेकाकडे पाहून आई म्हणाली ” घरी चल” मात्र हा अवलिया भेटीस येणाऱ्या लोकांचे प्रश्न सोडविण्यातच मग्न होता !
त्यांच्या वाहनाच्या चालकाशी चर्चा केली तर पाथर्डीचे लोक वाट पाहताहेत, तिकडे जावेच लागेल, आमदार साहेब कोणाचे ऐकणार नाहीत. असे सांगत त्यांचे वाहन नगरच्या दिशेने मार्गस्थ झाले.
पोटच्या गोळयाच्या चेहऱ्यावरील थकवा पाहून आई लेकराला घरी येण्याची विनवणी करीत असताना आमदार मात्र शरीराचा थकवा अंगावर काढत वाट पाहत असलेल्या मायबाप जनतेकडे निघून गेले.