अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- तालुक्यातील जनता सुज्ञ असून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे हे खरे असेल, तर ज्यांना ज्यांना निवडणूक लढवायची आहे
त्यांनी सर्वांनी जोमाने तयारीला लागावे. तालुक्यातील मायबाप जनतेच्या बळावर २०२४ ची कुस्ती देखील मी निकाली काढल्याशिवाय राहणार नाही. कारण सेटलमेंट करण्याचा माझा धंदा नाही असे कोणाचेही नाव न घेता आ.पाचपुते यांनी टीका केली.
तालुक्यातील देवदैठण येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोरोनामुळे निधी आणण्यात अनेक अडचणी येत असताना देखील तालुक्यात भरघोस विकास निधी आणण्याचे काम आपण केले.
तालुक्यात विकास कामे जोरात चालू असताना काही लोकांच्या पोटात दुखत आहे व असे महाभाग चालू विकास कामांमध्ये अडथळा आणण्यातच धन्यता मानत आहेत.
स्वत: आमदार असताना ज्यांनी डांबरीवर मुरूम टाकून तालुक्याला विकासाचा नवा मार्ग दाखवला ते आता विकासकामांबद्दल बोलत आहेत.
ओव्हरफ्लोचे आवर्तन चालू झाल्यानंतर पाणी माझ्यामुळे सुटले असे सांगत जे तालुकाभर फिरत होते तेच आता आवर्तन बंद झाल्यावर जबाबदारी आमदारांचीच म्हणतायेत.
तर मग आवर्तनाचे श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न कशासाठी असा सवालही पाचपुते यांनी यावेळी उपस्थित केला. तालुक्यातील पाणी प्रश्नाची जबाबदारी आमदार या नात्याने १०० % माझीच आहे. पाणी प्रश्नाबाबत मी सदैव तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे. व भविष्यातही करतच राहील.