अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. याला अटकाव करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहे.
राज्यावर आलेले संकट पाहता आर्थिक मदतीची गरज आता भासू लागली आहे. याच प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी एका अंगणवाडी सेविकेने पुढाकार घेतला आहे.
जामखेड तालुक्यातील जवळा येथील अंगणवाडी सेविका मीनाताई मुसा शेख यांनी आपल्या एक महिन्याचा पगार जामखेडमधील डॉ. आरोळे कोविड केअर सेंटरला देणगी म्हणून दिला. राज्य सरकारकडे करोनासंबंधी उपाययोजनांसाठी निधीची कमतरता आहे.
त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी एक दिवसाचा पगार द्यावा, असे आवाहन करण्यात आले. अंगणवाडीसेविकेपेक्षा जास्त पगार असलेल्या या कर्मचाऱ्यांनी याला विरोध केला होता. मात्र मीनाताई शेख यांनी संपूर्ण महिन्याचा पगारच कोविड सेंटरला दिला.
कोरोनासारख्या या महाभयंकर रोगाशी मुकाबला करण्यासाठी अनेक दानशूर हात पुढे येत आहे. यातच अल्प उत्पन्न असतानाही केवळ मनाने श्रीमंत असलेल्या मीनाताई यांनी कोणताही विचार न करता तातडीने आपला महिनाभराचा पगार कोविड सेंटरला दिला.
त्यांच्या या कार्याची दखल खुद्द जामखेड-कर्जतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी, “मीनाताई तुमची दानत पाहून अक्षरशः भारावून गेलो” असे म्हंटले आहे.