अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- मतदारसंघात विकास कामे करतांना जनतेची गरज कोणती याला प्राधान्य दिले जाते. गावची लोकसंख्या किती, आपल्याला किती मते मिळाली याचा विचार कधीच केला नाही.
त्यामुळेच तिनशे ते चारशे लोकसंख्या असलेल्या दुर्गम गावाला दीड ते दोन कोटी रुपये रस्त्यांसाठी मंजूर करून मुख्य रस्त्यांना जोडले जात आहे, याचे समाधान वाटते. गेली पाच वर्षात केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार होते. त्यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व जलयुक्तशिवार योजना सुरु केली.
त्या माध्यमातून मतदार संघातील अनेक गावात रस्ते व बंधाऱ्यांची मोठी कामे झाली. त्यामुळे पाणीसाठा वाढला असून सध्या पाऊस लांबला तरी एकही टँकर सुरु करण्याची वेळ आली नाही. मी सहा सात वर्षांपासून कोणावरही टीका न करता काम करण्याला महत्व दिले. ज्यांनी मला पदावर बसवले त्यांचाच मी विचार करते इतरांचा विचार मी करत नाही.
बोलणारे कोण आणि काम करणारे कोण याची जनतेला जाणीव असते. अशी टीका आमदार मोनिका राजळे यांनी ॲड.ढाकणे यांचे नाव न घेता केली. पुढे त्या म्हणाल्या की, निवडणुका आल्यावर इतर वेळी कुंभकर्णासारखे झोपलेले विरोधक जागे होतात.
त्यांना झालेला विकास दिसत नसेल तर माझ्या गाडीत या तुम्हांला मतदारसंघात फिरून विकास दाखवते. ते जमत नसेल तर तुमच्या कारखान्याच्या शेजारचा रस्ता तरी पहा तो पण मीच केला आहे. आम्ही मालाच्या ट्रक विकल्या नाही. हाणामाऱ्या केल्या नाही. विरोधकांना निवडणुका कधी होतील याची मात्र घाई झाली आहे.
एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला कळू नये ही आपली संस्कृती आहे. तुम्ही एक कोविड सेंटर सुरु केले तर किती मोठे काम केले असे वाटते. आम्ही व पदाधिकाऱ्यांनी अनेक कोविड सेंटर सुरु केले त्याचा गाजावाजा व व प्रसिध्दी केली नाही. कोणावर टीका केली नाही.
तुम्ही मात्र कोविड सेंटर उद्घान कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,पंकजाताई मुंडे यांच्यासह माझ्यावर टीका केली. आज सुरू केलेली कामे मागील सरकारच्या काळात मंजूर झालेली आहेत. महाविकास आघाडी सरकाराने कोरोनाची भीती दाखवून अनेक योजना बंद केल्या.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन चाळीस हजार कि.मी.रस्ते करू सांगितले अद्याप एकाही रस्त्याचा आराखडा,सर्व्हे,प्रस्ताव मंजुरी सुद्धा नाही. मुख्यमंत्री सांगतात कोरोना लसीकरणात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. यासाठी लस केंद्र सरकारकडून मोफत दिली जाते तरीही राज्य सरकारकडून केंद्र सरकारला बदनाम केले जाते.