file photo

अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधी पक्षांसह राजकीय पक्षांना कोरोनाची तिसरी लाट निर्माण होऊ नये यासाठी गर्दीचे राजकीय कार्यक्रम न घेण्याचे आवाहन करीत आहेत.

परंतु आमदार रोहित पवार हे मुख्यमंत्र्यांचे ऐकत नाहीत तसेच आजोबांचेही ऐकत नाहीत त्यामुळे आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.

माजी मंत्री शिंदे म्हणाले, आमदार पवार यांनी खर्डा किल्ल्यावर उभारण्यात येणाऱ्या ७४ फुटी भगव्या स्वराज्य ध्वजाचे‌ कर्जत येथील गोदड महाराज मंदिर परिसरात पूजा केली. स्वराज्य ध्वज यात्रेचा कर्जतमध्ये शुभारंभ झाला. परंतु यावेळी झालेल्या रॅलीदरम्यान अलोट गर्दी दिसली.

यावरून माजी मंत्री शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना लक्ष्य केले. ते पुढे म्हणाले, भगवा झेंडा लावायचा विद्यमान आमदारांनी ठरवले आहे, झेंड्याच्या प्रति सर्वांनाच अभिमान आहे. खर्डा किल्ल्याच्या विकासासाठी मी मंत्री असताना साडेसात कोटी रुपयांची योजना तयार केली होती.

त्यावेळी ३ कोटी ८६ लाख रुपये मंजूर केलेली ही कामे करत असताना आमच एकच चुकलं, आम्ही कामे केली, परंतु झेंडे लावले नाहीत? विद्यमान आमदार झेंडे लावायचं काम करतात त्यांना शुभेच्छा. पण या किल्ल्याच्या विकासाचा रखडलेला निधी आहे तो तातडीने आणावा असे आवाहन माजी मंत्री शिंदे यांनी केले.